||जय जय राम कृष्ण हरी||           ||जय जय राम कृष्ण हरी||           ||जय जय राम कृष्ण हरी||           ||जय जय राम कृष्ण हरी||          ||जय जय राम कृष्ण हरी||

||श्रीरुक्मिणी मंदिर||    

     श्रीरुक्मिणी मातेचे मंदिर श्रीविठ्ठल मंदिराच्या उत्तर बाजूस आहे.या मंदिराचे सभामंडप, मुख्य मंडप, मध्यगृह, गाभारा असे चार भाग आहेत. मध्यगृहाच्या उत्तरेकडील बाजुस एक खोली आहे. हे रुक्मिणीमातेचे शेजघर आहे. आत चांदीचा पलंग, गाद्या व मखमली बिछाना आहे.

 

 

     गाभार्‍याच्या समोरच उंच चौथरा आहे. त्यावर अत्यंत रेखीव रुक्मिणीमातेची पुर्वाभिमुख मूर्ती आहे. देवीचे हात विठ्ठलाप्रमाणे कटीवर आहेत. देवीला सौभाग्यलंकार घालुन, वस्त्रे नेसवून सजवितात,ठसठशीत कुंकवाचा मळवट भरतात. अत्यंत प्रसन्न मुद्रा असलेली श्रीरुक्मिणीमातेची मुद्रा पाहताच भाविक भक्त भक्तीयुक्त अंतःकरणाने तिचे दर्शन घेतात.

    रुक्मिणीमातेबद्दलची आख्यायिका अशी आहे की -श्रीकृष्णास असलेल्या मुख्य  ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.
 

श्रीरूक्मिणी मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम

  • पहाटे 4.00 वाजता         नामदेव पायरी दरवाजा उघडणे 
  • पहाटे 4.30 वाजता         श्रीरूक्मिणीचा काकडा 
  • पहाटे 5.00 ते 6.00        नित्यपूजा 
  • सकाळी 6.00              भाविकांना दर्शन सुरू 
  • सकाळी 11 वाजता           महानैवेद्य 
  • दुपारी 4.30 वाजता          पोषाख 
  • सायं 6.45                 धुपारती दिनमानाप्रमाणे

     चातुर्मासात रोज सकाळी ६ ते ८ श्रीमद भागवतावर प्रवचन चालते. सभामंडपात आतील पूर्व पश्चिम कमानीवर आतील बाजूने, लोखंडी चौकटी फ्रेममध्ये "रुक्मिणी-स्वयंवराची" सर्व कथा चित्ररूपाने लावली आहेत.इथे एकुण आठ चित्रे आहेत आणि ती सर्व चित्रे अतिशय सुरेख आहेत.
     दरवर्षी रुक्मिणी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. या उत्सव प्रसंगी घटस्थापनेपासून पोर्णिमेपर्यंत १५ दिवस दररोज रुक्मिणी मातेला तसेच पांडुरंगाला विविध वैशिष्टयपूर्ण पोषाख करण्यात येतात. प्रत्येक पोषाख बघण्यासाठी भाविकांची रुक्मिणी मातेच्या मंदिरात नेहमीपेक्षा जास्त गर्दी असते. नवरात्र महोत्सवात दररोज रात्री ९ ते ११ वा. पर्यंत संत तुकाराम भवन याठीकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय किर्तीच्या कलाकारांना आमंत्रित करण्यात येते. पंढरपूर शहरातील भाविक दरवर्षी या विशेष कार्यक्रमाची आतुरतेने प्रतिक्षा करीत असतात.तसेच मकरसंक्रांतीच्या दिवशीही या मंदिरात हळ्दीकुंकू कार्यक्रमास माताभगिनींची प्रचंड गर्दी असते.