विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन डोनेशनची सुविधा लवकरच...

मंदिरातील उत्सव
1) चैत्र शु.1 पाडवा
नवीन संव्तसरानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीस अभ्यंग स्नान तसेच गुढी उभा करणे. ग्रिष्मऋतुमुळे उष्णतेचा त्रास देवाला व रूक्मिणीला होवू नये म्हणून चंदनाचा लेप - उटी- देवाच्या व रूक्मिणी मातेच्या अंगास लावतात.

2) चैत्र.शु.9 रामनवमी
राम जन्मानिमित्त दु.12.00 वाजता श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस पांढरा पोषाख, गुलालाची उधळण, शिंतोडा प्रसाद, तसेच सभामंडपामध्ये राम जन्माची कथा व देवास उपवास.

3) चैत्र शु.11 एकादशी
कुलधर्म.

4) चैत्र शु.15 हनुमान जयंती
मंदिरातील सर्व हनुमान, मारूतीस अभिषेक, सेंद्राचे लेपण करणे, नैवेद्य तसेच रात्रो ब्रम्हवृंदाकडून मंत्रघोष, दक्षिणा, जलपाण.

5) वैशाख शु.3 अक्षय तृतीया
या दिनी महालक्ष्मीस व रूक्मिणी मातेस अलंकार तसेच महालक्ष्मी मंदिरात सुवासिनीना हळदी-कुंकु समारंभ.

6) वैशाख शु.15 नृसिंह जयंती
श्री विठ्ठल रूक्मिणीस उपवास, नृसिंह मंदिरात पुजा, अभिषेक व मंत्रघोष इ.

7) आषाढ शु.2 श्रींचा पलंग काढणे
आषाढी यात्रेनिमित्त भाविकांची गर्दी अधिक प्रमाणात असते. त्यानिमित्त दिनशुद्दी पाहून श्री विठ्ठल रूक्मिणीचा पलंग काढण्यात येतो. देवाच्या माघे लोड व रूक्मिणी मातेच्या पाठीमागे तक्या दिला जातो. या दिनापासून श्रींचे राजोपचार बंद असतात. भाविकांना भंगवंताचे 24 तास दर्शन घेता येते.

8) आषाढ शु.11 शासकीय महापुजा
आषाढी व कार्तिकी एकादशीनिमित्त महाराष्ट्र सरकारचे वतीने श्री विठ्ठल रूक्मिणीस महापूजा केली जाते, तसेच खाजगीवाले यांचे हस्ते पाद्यपूजाही केली जाते.

9) आषाढ शु.15 पालखी सोहळा
आषाढ शु.15 आश्विन शु. 10 तसेच कार्तिक शु.15 या दिनी श्रींची पालखी मिरवणूक निघते. सदरची मिरवणूक प्रदक्षिणा मार्गाने जावून चंद्रभागेस वंदन करून परत मंदिरात येते. याचा मुख्य हेतू; यात्रा कालावधीमध्ये भाविकांची अधिक प्रमाणामध्ये गर्दी असते त्यामुळे असंख्य भाविक भक्तांना दर्शन घेता येत नाही, ते दर्शन व्हावे हा होय.

10) आषाढ व.5 प्रक्षाळपुजा
आषाढी व कार्तिकी यात्रेमध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामध्ये श्री विठ्ठल रूक्मिणीचा पलंग काढला जातो. भक्तांना 24 तास दर्शनाचा लाभ होतो. त्यामुळे श्रीस थकवा येतो. सदरचा थकवा दूर व्हावा या हेतून प्रक्षाळ पुजा विधी केला जातो. त्या दिनी श्रींची गाभारा, शैन मंदिर व पुढील भाग स्वच्छ करून श्रीस रूद्राचा व पवमानाचा अभिषेक केला जातो, अलंकार घातले जातात, नैवेद्य दाखविला जातो. रात्रो देवाचा थकवा दूर व्हावा म्हणून साधारणपणे सतरा ते अठरा वनस्पती घालून तयार केलेला काढा श्रीस दाखविला जातो.

11) श्रावण शु.5 नागपंचमी
नागपंचमीनिमित्त नागदेवताची पुजा करणेकरिता सुवासिनीची गर्दी भरपूर प्रमाणात होत असते त्यानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मातेस अलंकार घातले जातात.

12) श्रावण शु.6 श्रीयाळ शष्टी-
श्रीयाळ शेट राजाने औट घटकेचे राज्य केले त्यानिमित्त शंकराची व पार्वतीची चिखलाची प्रतिकृती तयार केली जाते. सुवासिनीनी त्याचे पुढे पारंपारिक सासंकृतिक कार्यक्रम करतात व मोठ्या थाठामाटाने सदरची उस्तव मुर्ती मिरवणुकीने नदीच्या पात्रात विसर्जित केली जाते.

13) श्रावण शु.15 रक्षाबंधन
रक्षाबंधनानिमित्त श्री विठ्ठल रूक्मिणीस अलंकार घातले जातात व त्यादिनी श्रींची श्रावणी केली जाते. श्रावणी नदीच्या पात्रामध्ये बसून त्याठिकाणी धार्मिक विधी होवून यज्ञोपवित बदलली जाते. व ब्राम्हणास आहेर व दक्षिणा देवून मंदिरात सवाद्य मिरवणुकीने येतात.

14) श्रावण व.3 गोकुळआष्टमी उत्सव
श्रीकृष्ण जन्मानिमित्त गोकुळ आष्टमीचा उत्सव श्रावण वद्य 3 पासून आरंभ होऊन श्रावण वद्य 30 ला समाप्त होतो. सदरचा उत्सव मोठ्या थाटामाटाने साजरा केला जातो. त्यामध्ये रंगरंगोटी, सजावट, नळ्या, झुंबरे, माळा इ. लावले जाते. तसेच अखंड विणा उभा केला जातो. त्यातील पहारेकरी मानाचे ठराविक असतात. श्रीकृष्ण जन्मानिमित्त रात्रो 12.00 वाजता श्रींस पोषाख केला जातो व गुलालाची उधळण केली जाते, तसेच श्रीकृष्ण जन्माचे किर्तन, श्रीकृष्ण जन्माची कथा सांगितली जाते. सदर कार्यक्रमास गावातील व परगावचे भाविक उपस्थित असतात. श्रावण वद्य 10 या दिनी अखंड विण्याची समाप्ती होते, त्या दिनी महाप्रसाद केला जातो. तसेच श्रावण वद्य 12-खिरापत, श्रावण वद्य 13- काला व महाप्रसाद व श्रावण वद्य 30- उत्सवाची सांगता निमित्त दिंडी, सदरची दिंडी नगरप्रदिक्षणा करून मंदिरात येते व उत्सव समाप्त होतो.

15) भाद्रपद शु.6 गौरी
भाद्रपद महिन्यात गौरी आवाहन, पुजन व विसर्जन या दिनी श्रींस अलंकार घातले जातात. तसेच भजन, किर्तन व खिरापत केली जाते.

16) भाद्रपद शु.4 गणपती उत्सव
या दिवशी गणपतीची स्थापना केली जाते. गणपतीच्या पुढे मंडप, इलेक्ट्रिक डेकोरेशन केले जाते. गणपती आवाहनापासून गणपती विसर्जनापर्यंत गणपतीची पुजा, नैवेद्य, गणपतीची उपासणा, आरती, खिरापत इ. कार्यक्रम केले जातात. भाद्रपद शु.14 अनंत चतुर्दशी दिवशी गणपती विसर्जनाची मिरवणूक असते. मिरवणुकीमध्ये ढोल, ताशा, बँन्ड, सुर, सनयी, नळे, चंद्रज्योती तसेच मानकरी या मिरवणुकीमध्ये समाविष्ठ होतात. मिरवणुक मंदिरातून निघून नदीपात्रात विसर्जित होते.

17) भाद्रपद शु.8 राधाष्टमी
राधाष्टमी निमित्त उत्सव साजरा केला जातो. राधेस पोषाख व अलंकार घातले जातात. राधेच्या समोर कथा सांगितली जाते. तसेच रात्रो भजन व खिरापत होवून उत्सव समाप्त होतो.

18) भाद्रपद व.1 ज्ञानेश्वरी पारायण
भाद्रपद वद्य 1 ते भाद्रपद वद्य 13 पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण केले जाते. साधारण पणे 600 ते 700 भाविक व महिला पारायणास असतात. सदर पारायणाचे वैशिष्ठ्य असे की, सदर पारायणात महिलांचे उपस्थिती अधिक प्रमाणात असते. भाद्रपद वद्य 13 ला काल्याचे किर्तन होवून पारायणाची समाप्ती होते.

19) आश्विन शु.1 नवरात्र महोत्सव
आश्विन शु.1 ते आश्विन शु.15 पर्यंत नवरात्र उत्सव मोठ्या थाटामाटात केला जातो. विशेष म्हणजे रूक्मिणी मातेच्या सभामंडपामध्ये रूक्मिणी स्वयंवर कथा, रूक्मिणी स्वयंवर पारायण, पंढरीमधील व बाहेरगावच्या महिला भजनी मंडळाचे भजन, दररोज दुपारी 5.30 ते 6.30 पर्यंत हरि कथा यामध्ये दररोज एका संताचे चरित्र सांगितले जाते. सायं. 7.00 वाजता गोंधळ व रात्रो भजन, तसेच हरिकिर्तन होते. तसेच शु.12 खिरापत, शु.13 ला काला, शु.14 अन्नकुट, सदर अन्नकुटामध्ये सर्वांना महाप्रसाद दिला जातो. या उत्सवामध्ये विशेष कार्यक्रम असतात. आंतरराष्ट्रीय किर्तीचे गायक, तबला वादक, कथकनृत्य, सुगम संगीत, शास्त्रीय संगीत, भरतनाट्यम, गायन, संतवाणी इ. भरगच्च कार्यक्रम असतात, ते पाहण्यासाठी पंढरपुरातील प्रतिष्ठित मंडळी आवर्जुन उपस्थित असतात.

20) मार्गशीर्ष शु.6 चंपाषष्ठी
मार्गशीर्ष 6 ला मल्हारी म्हाळासांकात (खंडोबा) चा उत्सव त्यानिमित्त अभिषेक, पुजा, नैवैद्य, भंडारा इ. केला जातो. रात्रो गावातील बहुसंख्य मंडळी हातामध्ये दिवटी घेवून मंदिरात येतात व भंडाऱ्याची उधळण करतात.

21) पौष शु.6 भोगी संक्रांत, किक्रांत
या दिनी श्रींस अलंकार घातले जातात. गावातील व बाहेरील गावतील भगिनी रूक्मिणी मातेस वाणववसा करणेकरिता येतात.तिन्ही दिवस पूजा बंद असतात. महिलांची गर्दी मोठ्याप्रमाणात असते .सदर महिला महिलाखेळ खेळतात.

22) माघ शु.5 वसंत पंचमी
या दिनी श्री विठ्ठल रूक्मिणीस पांढऱ्या रंगाचा पोषाख केला जातो. श्रींच्या अंगावर केसरयुक्त रंग व गुलाल याची उधळण केली जाते. त्या दिनापासून वसंत उत्सव साजरा केला जातो.

23) फाल्गुन शु.15 होळी
या दिनी होळी पुजा असते. महाद्वार घाटावर सदरची होळी पुजा होते. दृष्ठप्रवृत्तीचा नाश व्हावा या हेतूने सदरी पुजा असते. मंदिरातून सवाद्य मिरवणुकीने महाद्वार घाटावर जाऊन होळीची पुजा होते. सदरची पुजा झाल्यानंतर दर्शन घेण्यासाठी पंढरपुरातील बहुसंख्य भाविक येत असतात.
24) फाल्गुन व.2 बीज
या दिनी जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा वैंकुठगमनचा दिवस, त्यानिमित्त महाराजांच्या पादुकास अभिषेक पुजा, पोषाख तसेच सभामंडपामध्ये व रूक्मिणी मंडपामध्ये निर्याणाच्या अभंगाचे भजन होते. सेवची गुलाल टाकून आरती केली जाते. भाविकांना प्रसाद दिला जातो. तसेच रात्रीही भजन होते.

25) फाल्गुन व.5 रंगपंचमी
या दिनी दुपारी 4.30 वाजता श्रींची पाद्यपुजा केली जाते. देवाच्या अंगावर केशरयुक्त रंग व गुलाल टाकला जातो. नंतर डफाची पुजा होते. नंतर डफाची पुजा होवून ठराविक मार्गाने सवाद्य मिरवणुक निघते. सदर मिरवणुकीमध्ये रंगाची उधळण केली जाते. व माणकर्‍यांना प्रसाद देवून वसंतोत्सवाची सांगता होते.

26) फाल्गुन व.6 नाथशष्ठी
सदर दिवशी एकनाथ महाराज यांच्या प्रतिमेस हार घातला जातो. दुपारी भजन होते व आरती व महाप्रसाद केला जाते.

27) जेष्ठ व.1 उटी समाप्ती
चैत्र पाडव्यापासून श्रींच्या अंगास लावणयात येमारा चंदनाचा लेप मृग नक्षत्र निघालेपासून स्थगित केला जातो.