विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन डोनेशनची सुविधा लवकरच...

                        || श्री पांडुरंग ||
आवडे पंढरी भीमा पांडुरंग | चंद्रभागा लिंग पुंडलिक ||1||
कामधेनू कल्पतरू चिंतामणी | आवडीचा धणी पुरविती ||2|| 
तुका म्हणे तेथे सुखा काय उणे | राहे समाधान चित्ताचिया ||3||


उंदड  पाहिले उदंड ऐकिले | उदंड वर्णिले क्षेत्रमहिमे ||1|| 
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर | ऐसा विटेवर देव कोठे ||2|| 
ऐसे संतजन ऐसे हरिदास | ऐसा नामघोष सांगा कोठे ||3|| 
तुका म्हणे आम्हा अनाथाकारणे | पंढरी निर्माण केली देवे ||4||
      

        श्री क्षेत्र पंढरपूर ही महाराष्ट्राचीच नव्हे तर संपुर्ण भारतवर्षाची अध्यात्मिक राजधानी मानली जाते. महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रांचे हे महापीठ आहे. येथे देव, भक्त आणि नाम यांचा त्रिवेणी संगम आहे. कर्म, ज्ञान आणि भक्तीचा मनोज्ञ समन्वय आहे, येथे सगुण-निर्गुणाचे, हरिहराचे ऐक्य आहे. वेदांत, भक्तिशास्त्रातील सर्वोच्च सिद्धांताच्या अभिव्यक्तीचे हे माहेर आहे. आनंद येथे मूर्तरूपाने नाचताना दिसतो. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील संतांनी आपल्या वाड्मयातून या क्षेत्राची मुक्तकंठाने स्तुती केली आहे, शब्दाशब्दातुन येथील अलौकिकतेचा उद्घोष केला आहे. भारतीय संस्कृतीच्या विचारप्रवाहातील भिन्न-भिन्न, परस्परविरोधी विचारधारा येथे एकरूप होतात, यावरूनच या क्षेत्राचे अलौकिकत्व सिद्ध होते. संतांना म्हणूनच येथील प्रत्येक गोष्टीचे कौतुक आहे, प्रत्येक वस्तुबद्दल आत्मीयता आहे. देव, चंद्रभागा, वाळवंट, येथील अन्य तीर्थे, संत, वारकरी, कीर्तन, नामघोष आदि सर्वच गोष्टी त्यांना मोहून टाकतात. एवढेच नव्हे तर येथील
तृण आणि पाषाण | ते ही देव मानावे || असे त्यांनी म्हटले आहे.

      आषाढ, कार्तिक, माघ आणि चैत्र या महिन्यातील शुद्ध एकादशीस तर येथे भक्तिप्रेमाचा पूर येतो. विशेषत: आषाढी-कार्तिकी एकादशीस लाखोंचा भक्तसमुदाय मोठ्या श्रद्धेने, प्रेमाने, अनेक अडचणी सोसून येथे येतो. आषाढ वारीस सर्व संतांच्या पालख्या येथे येतात. एकादशी ते पौर्णिमा सर्व संतांचे येथे वास्तव्य असते. वाळवंटात आणि इतरत्र कीर्तनाचे आणि भजनाचे फड असतात. दिनरजनी हाचि धंदा | गोविंदाचे पोवाडे || अवघे जगचि महासुखे | दुमदुमित भरले || असे वातावरण सर्वत्र असते. पौर्णिमेस गोपाळपूर येथे काला घेवून आणि विष्णुपदाचे दर्शन घेवून सर्व संत आपल्या क्षेत्री परततात.

      पंढरीचा इतिहास पुरातन आणि वैभवसंपन्न आहे. पद्मपुराण, स्कंदपुराणातून याचे संदर्भ दिसून येतात. श्रीपुंडलिकरायांनी दिलेल्या छोट्याशा विटेवर समचरणाने, समदृष्टीने, कमरेवर हात ठेवून उभा असणारा हा परमात्मा अल्पसंतुष्ट, दिनांचा दयाळ, भक्तवत्सल आहे. वारकर्‍यांच्या वारीने हा इतिहास, त्यातील तत्वज्ञान, भक्तीपरंपरांचे रक्षण करण्याचे मोठे कार्य केले आहे. आजही वारकरी संप्रदाय या परंपरा मोठ्या निष्ठेने, आनंदाने आणि सहजतेने जपतो आहे.

                || श्री विठ्ठल महात्म्य ||
       पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात. आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे पांडुरंग आणि श्रीविठ्ठल. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे. बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत, ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते. संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार - ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णू आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो. आजही वारकरी लोक बुधवारी पंढरपुरातून जात नाहीत.
 पुराणातील श्लोकाप्रमाणे
वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||

अर्थ-
वि- विधाता- ब्रम्हदेव
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी आहेत.

 || श्रीविठ्ठल मुर्तीवर्णन ||

        दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रीच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे, याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रीचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्ठी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्‌दयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यानी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.

         द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांचे युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील तो माझ्या दृष्ठीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्णअवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले. मुचकुंद राजाची निद्राभंग झाली. क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला. श्रीकृष्णास असलेल्या मुख्य  ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.
      पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्या काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमाधमानी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले. त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली. तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.
            पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतीक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात
 | पुंडलिकाभेटी परबह्म आले गा ||
       
विष्णुपद  -     भगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्री येताना गायी, गोपासह येवून प्रथम गोपाळपूर येथे थांबले होते. त्यावेळी त्यांचे पायाचे, गायीच्या खुरांच्या खुणा दगडावर उमटलेल्या असून सध्या त्याठिकाणास विष्णुपद म्हणतात. त्याचेच समोर देवर्षी नारदाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर या विष्णुपदावर भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. श्रीभगवान श्रीकृष्ण श्रीक्षेत्रात प्रथम येथे आले व ते मार्गशीर्ष महिन्यात होते त्यांचे वास्तव्य होते म्हणून त्या ठिकाणी दर्शनासाठी भाविक जातात, असे म्हटले जाते. त्या एक महिन्याचे काळात याठिकाणी दररोज अभिषेक पूजाविधी केले जातात.
              भगवान श्रीकृष्ण म्हणजेच भगवान विठ्ठल त्याच्या पंढरी आगमनाची ही आहे प्राचीन कथा. संत महात्म्यांनी विठ्ठलाचा महिमा मुक्त कंठानी गाइला आहे. संत नामदेव म्हणतात,
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुलभ | जैसे समारंभहरिकथेचा ||
ऐसे तीर्थ कोणी दाखवा सुखरूप | जेथे विविध ताप हरपती ||
नामा म्हणे संत जनाचे माहेर | गाता मनोहर गोड वाटे ||

                 अखिल त्रैलोक्यात विठ्ठलासारखा देव नाही. विठ्ठल संत जीवनातील जीवांचे जीवन आहे. श्रींच्या दर्शनाने भक्तभाविक अवघाची सुखरूप होतो. कारण,पंढरीच्या सुखा अंतपार नाही लेखा | संत चोखोबा सांगतात, यात्रेच्या काळात विठ्ठल विठ्ठल गजरी अवघी दुमदुमली पंढरी | टाळ मृदुंगांचा आवाज, हरिनामाचा गजर, खांद्यावर पताका आणि भजनात तल्लीन होऊन नाचणारे भाविक - आनंदाचे डोही आनंद तरंग, अशी अवस्था होवून जाते. विठ्ठल परमात्मा कसा आहे, याविषयी श्री संत तुकाराम महारांजानी म्हटले आहे की,
                     नाही घडविला नाही बैसविला |
                      विठ्ठल आमुचा स्वयंभु उभा ||

               विठ्ठलाचे स्वरूपाचे वर्णन करताना
                                     सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनिया ||
असे म्हटले आहे.
पंढरीचा महिमा सांगताना संत नामदेव म्हणतात,
 ऐका पंढरीचे महिमान | राऊळ तितुले प्रमाण ||
तेथील व्हण आणि पाषाण | ते हि देव जाणावे ||

इथल्या व्हणांकुरात आणि पाषाणातही देवत्व भरले आहे, म्हणूनच
 नामा विनवी संतापुढे | पंढरी पेठ न सांडावी ||
इथे प्रत्यक्ष परमात्मा वास करतो म्हणून पंढरीवास सोडून जावू नये. पंढरपुरी नित्य दिवाळीच असते.
नित्य दिवाळी असे पंढरपुरी | ओवाळीती नारी विठोबासी ||

पंढरपुरी नित्य हरिनामाचा गजर होतो. संत चोखोबामहाराज म्हणतात-
 विठ्ठल विठ्ठल गजरी | अवगी दुमदुमली पंढरी ||
अशा या पावन नगरीची यात्रा करणे खेरीज अन्य कोणतेही तीर्थव्रत रूचत नाही हे सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात-
पंढरीची  वारी आहे माझे घरी | आणिक न करी तीर्थव्रत ||
संतजनाबाई म्हणतात-
चला पंढरीसी जाऊ | रखुमाईदेवीवरा पाहू ||

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात- माझे जीवाची आवडी | पंढरपुरा नेईल गुढी | गोविंदाचे गुणी वेधिले | पांडुरंगी मन रंगले ||
  त्या परमात्म्याच्या भक्तिभावाने, प्रेमाने चित्त पंढरीत गुंतलेले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात-
उच्चनीच काही नेणे भगवंत | तिष्ठे भावभक्ती देखोनिया ||

तिथे भेदाभेद नाही. तो विठुराय उच्चनीचता पहात नाही. तो भक्तिभावाचा भुकेला आहे.
रामभक्त समर्थ रामदासस्वामीना विठुरायाच्या ठिकाणी प्रत्यक्ष रामाचे दर्शन झाले म्हणून त्यांनी विठ्ठलाला विचारले-
 इथे कारे उभा श्रीरामा | मनमोहन मेघ:शामा | काय केले धनुष्य बाण | कर कटावरी ठेवून | का केली सीतामाई | एथे राही रखुमाई | काय केले वानरदळ | ऐथे मेलवले गोपाळ | काय केली अयोध्यापुरी | एथे वसविली पंढरी | काय केली शरयुगंगा | एथे आणिली चंद्रभागा | रामदासी जैसा भाव | तैसा झाला पंढरीराव |
भक्तांच्या मनी जसा भाव तसा पांडुरंग परमात्मा दर्शन देतो. संत नरहरी सोनारांना पांडुरंगाचे ठिकाणी प्रत्यक्ष भगवान शंकराचे दर्शन झाले. अद्वैत तत्वज्ञान संताना झाले. भेद नाही हरीहर म्हणून संत सांगतात कैलासीचा राणा झाला पांडुरंग, भक्तांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभा राहणारा हा परमात्मा, संत महात्म्ये जीवनाची इतिकर्तव्यता कशात आहे ते सांगतात.
हेचि मन घडो जन्मांतरी | मागणे श्रीहरि नाही दुजे |
मुखी नाम सदा संताचे दर्शन | जनी 
जनार्दन ऐसा भाव |
नामा म्हणे नित्य तुझे महाद्वारी | कीर्तन गजरी सप्रेमाचे |


संत नामदेवाशी हितगुज करताना विठ्ठलनाथ सांगतात-
आषाढी कार्तिकी विसरू नका मज | सांगितसे गुज पांडूरंग | तिन्ही त्रिभुवनी नाही मज कोणी | म्हणे चक्रपाणी नामयासी ||

म्हणून संत नामदेव देखील पंढरीनाथाच्या चरणी मागणी सांगतात-
देवा वैंकुठवासी आम्हा नकोस धाडू वास रे पंढरी सर्वकाळ |
नामा म्हणे मज येथेचि हो ठेवी | सदा वास देई चरणाजवळी |

पंढरीचा महिमा सांगताना संत नरहरी सोनार म्हणतात-
धन्य ती पंढरी धन्य चंद्रभागा | धन्य पुंडलिक धन्य पांडुरंग |
तिवारे भवसंग जन्मोजन्मी ||

संत एकनाथांनी पंढरीला माहेरची उपमा दिली आहे.
माझे माहेर पंढरी | आहे भिवरेच्या तिरी ||
बाप आणि आई | माझी विठ्ठल रखुमाई |
माझी बहिण चंद्रभागा | करितसे पापभंगा |
पुंडलिक आहे बंधू | त्याची ख्याती काय सांगू ?||


             महाराष्ट्रातील संताप्रमाणेच कानडी व तेलगू संतानी देखील पंढरी- महात्म्य वर्णन केले आहे. कर्नाटकी संतच चौंडूरस, पुरंदरदास, कनकदास, इ.नी श्रीविठ्ठलाला आपले आराध्य दैवत मानले आहे.
               तेलगू संतकवि विठूरी यांनी पांडुरंग भक्तिपर अभंगरचना केली आहे. अशाप्रकारे बहुसंख्य संतानी श्रीविठ्ठल महात्म्याचा महिमा गाइला आहे.