विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन डोनेशनची सुविधा लवकरच...

पंढरपुर महात्म्य

* पंढरीचा पुराणप्रसिद्ध महिमा * 

        वारकर्‍यांचेच नव्हे, तर अनेक वैष्णवसंप्रदायांचे, केवळ महाराष्ट्रीयांचेच नव्हे तर कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेशादि अनेक प्रांतातील अनेक लोकांचे, मराठी भाषिकांचेच नव्हे तर अनेकविध भाषिकांचे परमात्मा पंढरीनाथ हे आराध्य दैवत आहे. अनेक संतानी या देवाचे माहात्म्य गाइलेले आहे. या दैवताची प्राचीनता यांस उपनिषदातील कथासंदर्भाशी जोडणारी आहे. छांदोग्य-उपनिषदाच्या चवथ्या अध्यायात आरंभीच ‘जानश्रुती’ नावाच्या राजाची कथा आली आहे.त्या राजास तो चांदण्याचा आनंद घेत बसला असता, काही हंसांचा संवाद कानावर आला, आकाशमार्गाने जाणारे हे हंस सामान्य कोणी नसून ऋषी होते. त्यांनी आपसात चर्चा चालविली होती. एकाने चंद्रांच्या पडलेल्या टपूर चांदण्याचे वर्णन केले. तेव्हा दुस-याने या चांदण्याहून सौख्यदायी जानश्रुती राजाचे कर्तृत्व असल्याचे सांगितले. तेव्हा अजून एक पक्षी बोलला की, ‘जानश्रुती’ राजाहूनही एक विलक्षण तेजस्वी व्यक्ती जगात आहे,तिचे नांव ‘रैक्व’. हा एक गाडीवान् आहे. पण ब्रम्हज्ञ आहे. जानश्रुतीच्या कानावर हे शब्द पडताच, त्याने या रैक्वाचा अनेक स्थानात शोध चालविला. शेवटी काश्मीरमध्ये हा रैक्व त्याला भेटला. त्या रैक्वाच्या संशोधनप्रसंगी जानश्रुती पंढरीत आल्याचा उल्लेख आहे-
' ततो निवृत्त आयात: पश्यन्भीमरथीतटे |
द्विभुजं विठ्ठलं विष्णुं भुक्तिमुक्तिप्रदायकम् |
यत्र भीमरथीतीरे बिन्दुमाधव संज्ञित:| 
हरि: स वर्ततेSद्यापि भुक्तिमुक्तिप्रदो नृणाम् ||’
            

                                              पद्यपु.|उत्तरखंड|गीता 6वा अध्याय-                                               माहात्म्य |  ५६,५७,५८ श्लोक, 

अर्थ - फिरत फिरत तो तेथून निघून भीमरथीच्या तीरावर रैक्वास शोधत निघाला. भीमातीरांवर दोन हातांचा, भोग व मोक्ष देणारा  ‘विठ्ठल’ नामक विष्णु जिथे आहे, तिथे तो आला. जिथे बिंदुनामक तीर्थात बिंदुमाधव या नावाने तो परमात्मा भीमातिरी आहे, तेथे तो राजा आला. तिथे माणसांना भोग व मोक्ष देणारा तो देव अद्याप आहे, असा तो उल्लेख आहे.
या पांडुरंगाचे महात्म्य सांगणारे पौराणिक म्हणवले जाणारे तीन ग्रंथ आहेत.

1) पद्यपुराण

2) स्कंद पुराण

3) विष्णुपुराण 

      एक पद्यपुराणान्तर्गत वाराहसंहितेल पांडुरंगमाहात्म्य आहे. याची अध्यायसंख्या ३२ व एकूण श्लोकसंख्या साधारणत: १२८९ आहे. सूतऋषी सर्व ऋषींना हे पांडुरंगमाहात्म्य सांगतात. त्यात ते नारदांनी हे पूर्वी शेषास सांगितले आहे, व त्याही अगोदर पूर्वी शंकरांनी ते पार्वतीस सांगितले आहे, असा उल्लेख केला आहे. यात पंढरीत पांडुरंग कसे आले? त्याचे माहात्म्य काय? भीमेची उत्पत्ती कशी झाली? पांडुरंगाच्या पायाखालच्या विटेचा इतिहास काय? चंद्रभागा म्हणजे काय? क्षेत्रातल्या इतर देवता व प्रमुख तीर्थे कोणती? याविषयी बरीच माहिती दिली आहे. पंढरी ही एक यंत्रात्मक नगरी असून या यंत्राच्या मध्यस्थानी पंढरीनाथ विराजमान आहेत व तेथून त्रिकोण-अष्टकोणादी आवरणस्थानात इतर देव आहेत, असे सविस्तर सांगितले आहे. पंढरी म्हणजे काशी, नीरानरसिंहपूर हे प्रयाग व कोर्टी किंवा विष्णुपद हे गयाक्षेत्र आहे, अशी त्रिस्थळीयात्रा पंढरीसंबंधाने वर्णिली आहे. पंढरीतील काशीयात्रेचा विधीही सांगितला आहे. पंढरीत गयाश्राद्ध कसे करावे, याची माहिती दिली आहे.
      दुसरे 'पांडुरंगमाहात्म्य' स्कंदपुराणाच्या उत्तरसंहितेतले असून त्याचे १२ अध्याय आहेत. एकूण श्लोक संख्या साधारणत: ८१३ आहे. यातही स्कंदांना ऋषींनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने त्यांनी ऋषींसह कैलासात शंकराकडे जाणे केले. शंकरांना पार्वतीने त्यावेळी तोच प्रश्न विचारला होता. उत्तर द्यायचे चालू होणार, इतक्यात स्कंदांनी ऋषीसंह येऊन तोच प्रश्न विचारल्यावरून शंकरांनी स्कंद, ऋषी व पार्वती सर्वांना पंढरीचा महिमा सांगितला. 'सर्वोत्कृष्ट दैवत, तीर्थ व क्षेत्र कुठे आहे' असा तो प्रश्न होता.

‘पुष्करात् त्रिगुणं पुण्यं केदारात् षड्गुणं भवेत् |
 वारणश्याद् दशगुणं अनन्तं श्रीगिरेरवि ||
स्कंदपु. पांडुरंगमा. २/५

                                                         

       अर्थ- हे क्षेत्र पुष्करक्षेत्राच्या तीनपट, केदाराच्या सहापट, वाराणशीच्या दहापट व श्रीशैलाच्या अनंतपट फल देणारे आहे. असा या क्षेत्राचा महिमा आहे. येथे यात्रा-वारी-वास व दानधर्माचे महत्व आहे. या क्षेत्राच्या चार दिशेला चार अंतर्द्वारे व चार बहिर्द्वारे आहेत. कुठल्याही दिशेने पंढरीत प्रवेश करताना या द्वारातून प्रवेश करावा व द्वारस्थ देवतांचे दर्शन घ्यावे, असा नियम आहे. अंतर्द्वारात पूर्वेला संध्यावळीची सरस्वती, दक्षिणेला माचणूरचा सिद्धेश्वर, पश्चिमेला भुवनेश्वरी व उत्तरेला महिषासुरमर्दिनी आहे. बहिर्द्वारात पूर्वेला तेरचा त्रिविक्रम, दक्षिणेत कृष्णातीरीचा शूर्पालय क्षेत्रातला कोटेश्वर, पश्चिमेला कोल्हापूरची महालक्ष्मी तर उत्तरेला नीरानरसिंहपूरचा नरसिंह आहे, असे सांगितले आहे.

‘क्षेत्रे ह्यस्मिन् महाविष्णु : सर्वदेवोत्तमोत्तम:| आस्ते योगीश्वरोद्यापि शक्तिभिर्नवभि:सह | विमलोत्कार्षिंणी ज्ञाना क्रिया योगा तथैवच | प्रव्ही सत्या तथेशानानुग्रहा चेति शक्तय :|’                                                          स्कंदपु. पांडुरंगमा. 7/6,7,8 

 अर्थ - या क्षेत्रात सर्व देवांमध्ये उत्तमोत्तम असणारा, योगीश्वर, महाविष्णु आपल्या नऊ शक्तीसंह अद्याप राहतो. विमला, उत्कर्षिणी, ज्ञाना, क्रिया, योगा, पव्ही, सत्या, ईशाना, अनुग्रहा या त्या नऊ शक्ती आहेत.
* पांडुरंगासमोर गरूड, उजव्या बाजुला सनकादिकांसह ब्रह्मा, डाव्या बाजूला अकरा रूद्रांसह शंकर व पाठीमागच्या बाजुला इंद्रादी सर्व देव सतत उभे असून ते सतत श्रीपांडुरंगाचे स्तवन करतात. * पांडुरंगाच्या मंदिराच्या छायेचा आश्रय करणे, पांडुरंगाचे दर्शन, पांडुरंगासमोर त्याच्या नामगुणलीलांचे गायन, रंगशीलेवरील नृत्य, धूपारतीच्या वेळेचे देवाचे दर्शन, दीप ओवाळतानाचे दर्शन, मंदिरात झाडलोट करणे इ.सेवा, वेदशास्त्रादिग्रंथांचे पांडुरंगासन्निध पठण, देवाचे तीर्थ घेणे, 25 हात किंवा 10 हातांची देवाच्या सभोवतीची ‘अर्चभाग’ नामक जागा व तेथील सेवा, या सर्व सेवा केल्याचे महत्व काय, याचे सविस्तर विवेचन या ग्रंथात आले आहे. * पंढरीतले कुंडलतीर्थ, पद्मतीर्थ या तीर्थांचा महिमा सांगितला आहे. * पंढरीत धौम्यादी ऋषींसह व आपल्या सर्व भावांसह युधिष्ठिर यात्रेसाठी येऊन गेले. बलरामाने या क्षेत्राची यात्रा व येथे अनुष्ठान केले. रूक्मिणीने इथेच अनुष्ठान करून प्रद्युम्न नावाचा मुलगा मिळविला आहे. * भीमेचा प्रादुर्भाव व पंढरीत आगमन, पंढरीतला क्षेत्रपाळ श्रीभैरव, मुक्तकेशीनामक गोपीने केलेले येथील तप व देवाने तिचा केलेला अंगीकार यांच्याही कथा या माहात्म्यात आहेत. तिसरे ‘पांडुरंगमाहात्म्य’ विष्णु पुराणातल्या विष्णुधर्मकथन प्रकरणात आले आहे. याचे सहा अध्याय असून श्लोक संख्या साधारण 186 आहे. वसिष्ठऋषींनी त्रित ऋषीला हे सांगितले आहे. यात पुंडलीकाची कथा सविस्तर आहे. त्याने केलेले पांडुरंगाचे यथार्थ सविस्तर वर्णन आहे. त्याच्यासाठी भगवंताचे येथे येणे झाल्यावर तो परमात्मा जशा रूपाने प्रकट झाला, तसाच त्याचा श्रीविग्रह ब्रम्हदेवाने तयार करून पुंडलिकास दिला, असे वर्णन आहे. क्षेत्रेषु तीर्थेष्वथ दैवतेषु भक्तेषु सर्वेष्विह वै वरिष्ठम्| श्रीपौण्डरींक किल चन्द्रभागा श्री विठ्ठलोयं मुनिपुण्डरीक:|| अर्थ- सर्व क्षेत्रात वरिष्ठ क्षेत्र श्रीपंढरी, सर्व तीर्थात वरिष्ठ तीर्थ चंद्रभागा, सर्व देवात श्रेष्ठ देव श्रीविठ्ठल व सर्व भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त श्रीपुंडलिंक हा आहे. या श्लोकाचा बरोबर अनुवाद श्रीतुकाराम महाराज एका अभंगात करतात- अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखिलिया || अवघीच पापे गेली दिंगंतरी | वैकुंठ पंढरी देखिलिया || अवघिया संता एक वेळा भेटी | पुंडलिक दृष्टी देखिलिया || तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक | विठ्ठलचि एक देखिलिया ||


असा हा पंढरीचा पुराणवर्णित महिमा आहे.