कार्तिकी यात्रा २०२१
कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी पहाटे श्री विठ्ठल- रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हस्ते करण्यात आली. दर्शन रांगेतील कोंडीबा देवराव टोणगे (वय 58) आणि त्यांच्या पत्नी प्रयागबाई कोंडीबा टोणगे (वय 55, राहणार मु. निळा, पो. सोनखेड, ता. लोहा, जिल्हा नांदेड) या दाम्पत्यास वारकरी प्रतिनिधी म्हणून महापूजेच्या वेळी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. शेतकरी असलेले हे दाम्पत्य गेली तीस वर्षे सलग पंढरीच्या वारीसाठी येत आहे. महापूजेनंतर मंदिर समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार, सौ. पवार तसेच वारकरी प्रतिनिधीचा मान मिळालेल्या टोणगे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मंदिर समितीचे सह अध्यक्ष मा. गहिनीनाथ महाराज औसेकर व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.