काकडा
काकडा पहाटेच्या श्रीं च्या उपचारांना काकडा या उपचाराने सुरवात होते. व पांडुरंगाला काही वैदिक आणि पौराणिक उपचाराने जागे केले जाते. श्री अकारण करून अशरण् रूक्मिणी प्राण संजीवन परमात्मा श्री पांडुरंगाला उत्तिष्ठ्य उत्तिष्ट्य गोविंद म्हणून उठवले / जागवले जाते. आणि देवाच्या  नित्योपचाराला सुरवात होते. पहाटे 4.00 वाजता श्री संत नामदेव महाराज पायरी येथील पितळी दरवाजा उघडला जातो.
पहाटे 4.30 वाजता पांडुरंगाच्या उपचारांना काकडा या उपचाराने सुरवात होते. पांडूरंगाला वैदिक व काही पौराणिक मंत्रांनी जागे केले जाते.

उत्तिष्ठोत्तिष्ठगोविन्द त्यज निद्रां जगत्पते |
त्वया चोत्थीयमानेन उत्थितं भुवनत्रय् ||
उत्तिष्ठोत्तिष्ठगोविन्द त्रैलोक्यं मंड्:गलं कुरू ||
या त्वरा द्रोपदीत्राणे या त्वरा गजमोक्षणं |
मय्यार्ते करूणामूर्ते सा त्वरा क्क गता हरे ||
हरये नम: हरये नम :हरये नम :

असा संस्कृत पूर्ण श्लोक म्हणून देवाला जागे करणे. सदर श्लोक शांतीपाठामधील मंत्र आहे. नंतर कानया हरिदास यांनी रचलेला काकडा देवास ओवाळला जातो.
सदर वेळी
| अनुपम्य नगर | पंढरपूर | भीमा मनोहर | संताचें माहेर | 
अव्यक्त आदिमूर्ति | परब्रम्ह साकार | विटेवरी उभें नीट |कटी ठेवूनिया कर || 1||

जय देवा पांडुरंगा | जय आनंदकंदा || आरति ओवाळीन | पुंडलीक वरदा | जयदेवा पांडुरंगा ||ध्रु.||            

गोमती गोदावरी | यमुना सरस्वती | कृष्णा तुंगभद्रा | नर्मदा भागिरथी | 
सकळीक मध्यान्ही | चंद्रभागेसी येती | कनक पात्राचि आरतीया | विठोबासी ओवाळती ||2||  जयदेवा पांडुरंगा ||ध्रु ||

                                                           
धन्य हा वेणुनाद | क्रिडा करी गोविंद | पश्चिमेस पद्मतीर्थ | क्षेत्रपाळ प्रसिद्ध | नारद तुंबर हो | गाती ध्रुव प्रल्हाद | प्रेमं आनंदभरित | करिताती आनंद ||3|| जय देवा पांडुरंगा ||ध्रु.||                           

तीर्थां क्षेत्रांचिया | ऐशा मिळती कोटी | पांडुरंग एक स्थळी नांहीं एकचि घडी | वामंागे रखुमाई | वेद बोलती प्रौढी | जयजयकार गर्जती | देव तेहतीस कोटी ||4||जय देवा पांडुरंगा ||ध्रु.||

ऐसा देवाधिदेवो | विठू पंढरिरावो | भक्तजना कुंटुबिया देवी रखुमाई राही हो | पुरवील मन कामना कैवल्य पावो | कानह्या हरिदास | मागे प्रेमपाशा हो | जय देवा पांडुरंगा ||ध्रु.||

हा काकडा म्हणला जातो. नंतर देवास खडी साखरेचा नैवेद्य समर्पण करून आचमन देवून देवाच्या अंगावरील हार काढले जातात. व शाल काढून परत घातली जाते. व देवाचे पाय धुवून धूप, दीप, नैवेद्य होवून देवाची आरती केली जाते.


आरती

युगे अठ्ठावीस विटेवरीं उभा
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा ||
चरणी वाहे भीमा उद्धरी जगा ||1||
जय देव जय देव जय पांडुरंगा |
रखुमाई वल्लभा राहीच्या वल्लभा पावे जिवलगा ||धृ||
तुळसी माळा गळा कर ठेवूनि कटी ||
कांसे पीतांबर कस्तुरि लल्लाटी ||
देव सुरवर नित्य येती भेटी |
गरूड हनुमंत सन्मुख उभे राहती ||जय.||2||
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळां ||
राही रखुमाबाई राणीया सकळा |
ओंवाळिती राजा विठोबा सावळा ||जय||3||
ओंवाळू आरत्या कुर्वंड्या येती ||
चद्रभागेमाजी सोडुनियां देती ||
दिंड्या पताका  वैष्णव नाचती |
पंढरीचा महिमा वर्णावा किती || जय || 4 ||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ||
चंद्रभागेमाजीं स्नाने जे करिती ||
दर्शनहेळामात्रें तयां होय मुक्ति ||
केशवासी नामदेव भावे ओंवाळिती || जय || 5 ||

ही नामदेव महाराजानी रचलेली आरती, तसेच
|| आरती आनंत भुजा | विठू पंढरी राजा ||
ही नाथ महाराजांनी रचलेली आरती गायली जाते. नंतर मंत्र पुष्पांजली होऊन पंचोपचार पुजेची सांगता होते.

देशकालाचा संकल्प केला जातो व न्यास केले जातात. गणपती पूजन, भुमी पूजन, वरून पूजन, शंख पूजन, घंटा पूजन करून संकल्प केला जातो. नंतर देवाचे ध्यान करून देवाच्या अंगावरील वस्त्र काढले जाते. व पूजेस आरंभ होतो. पाद्य, अर्घ, आचमन देवून देवाला गरम पाण्याने स्नान घातले जाते.

देवाला दुधाचा अभिषेक केला जातो.
| पयपृथीव्याम्पय औषधीषुपयो दिव्यन्तरिक्षे पयोधा:| पयस्वती प्रदिश:संतुमह्यम् ||1|| या मत्रांचे उच्चारण केले जाते.

दधी स्नान
| ओम दधीक्राव्णोअकारिषणज्जिष्णोपश्वस्य वाजिन:| सुरभिनोमुखाकरत्प्रणSआयू षितारिषत् ||2||
या मंत्रोच्चाराने देवाच्या पायावर दह्याचा अभिषेक घातला जातो. 

लोणी
देवाच्या मुखास एका हाताने लोणी लावले जाते. त्याचवेळी देवास आरती ओवाळली जाते, त्यास लोण्याची आरती असे संबोधले जाते.
तूप
ओम घृतंमिमिक्षेघृतमस्ययोनिर्घृतेश्रितो घृतम्वस्यधाम् | अनुष्वधमावहवस्वाहा कृतं वृषभवक्षिहव्यमं||
या मंत्रोच्चाराने देवाच्या पायावर तुप घातले जाते.
मध
ओम मधुवाताऋतायते मधु क्षरन्ति सिन्धवा:| माध्वीर्न: सन्तोषधी :||
मधुनक्त मुतोषसी मधुमत्पार्थिव रज:| मधुद्यौरस्तु न:पिता ||
मधु मान्नोवनस्पतिर्मधुमाँ 2 अस्तु सूर्य :| माध्वीर्गावो भवन्तु न: ||4||
या मंत्रोच्चाराने देवाच्या पायावर मध घातला जातो.
साखर
ओम स्वाद्वींत्वा स्वादुना तीव्रां तीर्वेणा मृता ममृतेन | मधुमतीं मधुमता सृजामि स सोमेन ||5||
हा मंत्र म्हणून देवाच्या पायावर साखर घातली जाते. नंतर दुधाचा अभिषेक केला जातो. त्यावेळी श्री सूक्ताचा पाठ म्हणला जातो. देवास गरम पाण्याने स्नान घातले जाते.
सिद्धोद्क
देवास केशरयुक्त गरम पाण्याचे गंध लावून नैवेद्य दाखवून स्नान घातले जाते. नंतर देवास धूप दीप करून पुरूष सूक्ताचा पाण्याचा अभिषेक केला जातो. देवाचे अंग पुसून देवास वस्त्र समर्पण यज्ञोपवित घातले जाते. नंतर देवास पोषाख केला जातो. पोषाख झालेनंतर देवाच्या मुखास अत्तर लावले जाते. देवास गंध अक्षत लावली जाते. देवास हार तुरा तुळशीपदे वाहून पाद्यपूजा केली जाते नंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून देवाची प्रल्हाद महाराजांनी रचलेली आरती म्हणली जाते. तांदळाची खिचडी, तूप, दही, शेंगदाणाचटणी, पापड, खोबर्‍याचा किस, पानाचा विडा असा पहाटेचा नैवेद्य श्रीविठ्ठल व श्रीरूक्मिणी मातेस दाखविला जातो.

श्रीविठठलरूक्मिणीस दाखविण्यात येणाऱ्या नैवेद्याचा तपसील

पहाटेचा नैवेद्य

पहाटेचा नैवेद्य 

श्रीविठ्ठल-श्रीरूक्मिणी 

  • तांदळाची खिचडी 
  • तूप वाटी 
  • साय वाटी 
  • शेंगदाणा चटणी 
  • पापड 
  • खोबर्‍यांचा किस 
  • पानाचा विडा

आरती झालेनंतर मंत्र पुष्पांजली होते. संकल्प सोडला जातो व शंखामध्ये पाणी घेवून देवाच्या अंगावरून तीन वेळा ओवाळून सदरचे पाणी भक्ताच्या मस्तकावर शिंपडले जाते त्यास भागिरथी असे संबोधले जाते.व प्रार्थना म्हणली जाते. सर्वेजना सुखिनोभवंतु प्रार्थना म्हणल्यानंतर लगेचच दर्शनास सुरवात होते.