श्रीक्षेत्र
पंढरपूर हे भिमा नदीच्या तीरावर
आहे. भीमा नदिला भिवरादेखील म्हणतात, ही नदी इथे अर्धचंद्राकार वाहते
म्हणून तिला चंद्रभागा हे नांव आहे.
याविषयी
अख्यायिका सांगितली जाते की,
शापित चंद्राने इथे येवून या तीर्थात स्नान केले व तो शापमुक्त झाला
म्हणूनच ही नदी अर्धचंद्राकार वाहू लागली व लोक तिला चंद्रभागा म्हणू
लागले. काही संशोधकाचे मते भागवताच्या स्कंद ५ अध्याय १९ मधील १८ व्या
श्लोकात हिंदुस्थानातील महान नद्यांचे वर्णन करताना भागीरथी व चंद्रभागा
या नद्यांचे अस्तित्व दाखविलेले आहे. तसेच महाभारताच्या भीष्मपर्वात
अध्याय ९ मध्ये देखील चंद्रभागा नदीचा उल्लेख केलेला आढऴतो. आनंद
रामायणातदेखील भीमा नदीचा उल्लेख आढळतो. प्रभु रामचंद्रांनी सीताशोधार्थ
लंकेला जाताना या तीर्थक्षेत्राला भेट दिल्याचा प्रसंग वर्णिला आहे.
ज्या
वाळवंटी सकल संताची मांदियाळी कीर्तनरंगी नाचत, नामघोषात मग्न होवून
कृतार्थ झाली, त्या वाळवंटात नाचत जयघोष करावा आणि ज्या चंद्रभागेच्या
पवित्र स्नानाने संतासह लाखो भाविक, भक्त पापमुक्त झाले, धन्य झाले त्या
तीर्थात स्नान करण्याची, पावन होण्याची उत्कट इच्छा भक्तजनाच्या मनी
निर्माण होते.
भाविक पंढरीत पाऊल ठेवताच प्रथम चंद्रभागेत स्नान करून पावन होतात. ज्या भक्तराज पुंडलिकाला दर्शन देण्यासाठी परब्रह्म परमात्मा पांडुरंग आला आणि त्याच्या प्रार्थनेनुसार त्याने दिलेल्या विटेवर युगे अठ्ठावीस भक्तांना दर्शन देऊन कृतार्थ करण्यासाठी भीमातीरी उभा राहिला आहे, त्या पुंडलिकाचे दर्शन घेतात. चंद्रभागेच्या वाळवंटात अन्य संत मंडळीची समाधी स्थाने आहेत. नदीचे पात्र विशाल, अर्धचंद्राकार व देखणे आहे.