विठ्ठल रुक्मिणी ऑनलाईन दर्शन आणि ऑनलाईन डोनेशनची सुविधा लवकरच...

आरती श्रीरूक्मिणीदेवीची
श्रीकृष्णकथा तुजला आवडे बालपणी |
जडले चित्त हरिपदी करूनि गुणश्रवणी |
ब्राह्मण सज्जन कीर्तन करिती जे कोणी |
त्याला तंु बहु देशी सुवर्णरत्नमणी |
जय जय भीमकतनये देवी जगन्माते |
श्रीहरिकान्ते रूक्मिणी रक्षण करी माते |
जय जय भीमकतनये.....
पाहुनि प्रेम हरिच्या यशश्रवणमननी |
तुजला कृष्णार्पण करू म्हणती जनकजननी |
रूक्मय म्हणतो काळा परदारागमनीं |
यास्तव शिशुपालाला देईन मी भगिनी |
सुदेवहस्ते प्रेमे पाठविले पत्र |
द्वारावतिहुनि धावुनि ये देवकीपुत्र |
जिंकुनि शिशुपालादिक दुर्जन अपवित्र |
पाणिग्रहण करी तुझे कृष्णकमल नेत्र |
रूचिली रहावयाला ही पंढरी नगरी |
नित्यंनिरंतर नौबत वाजे तव द्वारी |
भजन करिती जन सन्मुख मंडप नरनारी |
निजदासचि कीर्ती निगमागम सारी |
निगमागम तुज वर्णिती व्यापक तू माया |
मातोश्री सर्वांची श्रीविठ्ठलराया |
प्रेमळ करिती पूजन त्यावरि तुझी माया |
यशवन्तात्मज भावे तद्वत् गुण गाया |
जय जय भीमकतनये.....