संत सोयराबाई (संत चोखामेळा यांची पत्नी)

येई येई गा गरूडध्वजा | विटेसहित करीन पूजा ||
धूपदीप पुष्पमाळा | तुज समर्पू गोपाळा ||
पुढे ठेवूनिया पान | वाढी कुंटुंबी ते अन्न ||
तुम्हा योग नव्हे देवा | गोड करूनिया जेवा ||
विदुराघरच्या पातळकण्या | खासी मायबाप धन्या ||
द्रोपदीच्या भाजीपाना | तृप्ति झाली नारायण ||
तैसी झाली येथे परी | म्हणे चोखयाची म्हारी ||