Sant Tukaram
श्री संत तुकाराम महाराज

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनिया ||
गळां तुलसीहार कांसे पीतांबर | आवडे निरंतर हेचि ध्यान ||
मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमणी विराजित ||
तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने ||
सदा माझे डोळा जडो तुझी मुर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया ||
गोड तुझे रूप गोड तुझे नाम | देई मज प्रेमळ सर्वकाळ ||
विठो माऊलीये हाचि वर देई | संचरोनी राही ह्रदयामाजी ||
तुका म्हणे काही न मागो आणिक | तुझे पायी सुख सर्व आहे ||

घेई घेई माझे वाचे | गोड नाम विठोबाचे ||
डोळे तुम्ही घ्या रे सुख | पाहा विठोबाचे मुख ||
तुम्ही आईका रे कान | माझ्या विठोबाचे गुण ||
मना तेथे धाव घेई | राही विठोबाचे पायी ||
तुका म्हणे जीवा | नको सोडू या केशवा ||

हेचि दान देगा देवा | तुझा विसर न व्हावा ||
गुण गाईन आवडी | हेचि माझी सर्व गोडी ||
न लागे मुक्ती धन संपदा | संतसंग देई सदा ||
तुका म्हणे गर्भवासी | सुखे घालावे आम्हांसी ||