श्री संत सेना महाराज

उदार तुम्ही संत | मायबाप कृपावंत ||
केवढा केला उपकार | काय वानू मी पामर ||
जडजीवा उद्धार केला | मार्ग सुपंथ दाविला ||
सेना म्हणे उतराई | होता न दिसे कांही ||

सांडोनि कीर्तन | आणिक न करी साधन ||
पुरवा आवडीचे आर्त | तुम्हा आलो शरणागत ||
मुखी नाम वाहिन टाळी | नाचे निर्ल्लज राऊळी ||
सेना म्हणे नुपेक्षावे | हेचि मागे जीवे भावे ||

जन्मासी येवोनि पहारे पंढरी | नाचा महाद्वारी देवापुढे ||
चंद्रभागेतीरी करा तुम्ही स्नान | घ्यारे दर्शन पुंडलिकाचे ||
सेना म्हणे माझा पुरलासे हेत | डोळे भरूनी पहात विठोबासी ||