श्री संत निळोबाराय महाराज

धन्य धन्य पुंडलिका | केला तरणोपाय लोका ||
एका दर्शनेचि उद्धार | केले पावन चराचर ||
चंद्रभागा पंढरपूर | भक्त आणि हरीहर ||
निळा म्हणे सुलभ केले | भूमि वैंकुठ आणिले ||

राही रूक्मिणी सत्यभामा | पुरूषोत्तमा वामसव्य ||
पुंडलिक दृष्ठीपुढे | उभे देहूडे सनकादिक ||
जयविजय महाद्वारी | गरूड शेजारी हनुमंत ||
निळा म्हणे भोंवते संत | किर्तने करीत चौफेर ||

नाना अवतार धरिले जेणे | दैत्यांसी उणे आणियेले ||
तो हा संचांचिये भारी | उभा तीरी चंद्रभागे ||
तुळशीपत्र बुक्का मागे | धन वित्त न लगे म्हणतसे ||
निळा म्हणे अंतरींचा | भाव साचा ओळखे ||

मार्ग दाऊनी गेले आधी | दयानिधी संतपुढे ||
तेणेचिं पंथे चालो जाता | न पडे गुंता कोठे काही ||
मोडूनिया नाना मते | देती सिद्धांते सौरसु ||
निळा म्हणे ऐसे संत | कृपावंत सुखसिंधु ||