श्री संत नरहरी सोनार महाराज

देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार ||
देह बागेसरी जाण | अंतरात्मा नाम सोने ||
त्रिगुणाची करून भूस | आंत ओतिला ब्रम्हरस ||
जीव शीव करून फुंकी | रात्रंदिवस ठोकाठोकी ||

विवेक हातवडा घेऊन | कामक्रोध केलाचूर्ण ||
मनबुद्धीची कातरी | रामनाम सोने चोरी ||
ज्ञान ताजवा घेऊनि हाती | दोन्ही अक्षरे जोखिती |
खांद्या वाहोनी पोतडी | उतरला पैलथडी ||
नरहरी सोनार हरिचा दास | भजन करी रात्रंदिवस ||

शिव आणि विष्णु एकच प्रतिमा | ऐसा ज्याचा प्रेमा सदोदीत ||
धन्य ते संसारी नर आणि नारी | वाचे हरिहर उच्चारिची ||
सोनार नरहरी न देखे पै द्वेत | अवघा मूर्तिमंत एकरूप ||