गुरू जनार्दन स्वामी ( संत एकनाथांचे गुरू )
नको गुंतु लटिक्या प्रपंचासी बापा | मार्ग आहे सोपा पंढरीचा ||
न लगो पुसावे आटाआटी कांही | आणिके प्रवाही गुन्तू नको ||
भांबावल्यापरि जन झाले मूढ | विसरले दृढ विठोबासी ||
म्हणे जनार्दन एकनाथा निके | साधी तू कौतुके हेची वर्म ||
देह शुद्ध करून भजनी भजावे | आणिकाये नाठवावे दोषगुण ||
साधने समाधि नको पा उपाधी | सर्व समबुद्धी करी मन ||
म्हणे जनार्दन घेई अनुताप | सांडी पां संकल्प एकनाथा ||
आणिक या सूष्ठीं साधन पैं नाही | घेई पा लवलाही नाम वाचे ||
उभा दिगंबर कटी ठेवूनि कर | शोभतसे तीर चंद्रभागा ||
पुंडलिके निज साधिले साधन | ते तू हऋदयी जाण धरी भावे ||
म्हणे जनार्दन एकनाथा ह्रदयी | विठ्ठलमंत्र ध्यायी सर्वकाळ ||
|