श्री संत चोखोबामहाराज

ऊस डोंगा परी रस नोव्हे डोंगा | काय भुललासी वरलि या रंगा ||
कमान डोंगी परी तीर नोव्हे डोंगा | काय भुललासी वरलि या रंगा ||
नदी डोंगी परी जल नोव्हे डोंगे | काय भुललासी वरलि या रंगा ||
चोखा डोंगा परी भाव नोव्हे डोंगा | काय भुललासी वरलि या रंगा ||

विठ्टल विठ्ठल गजरी | अवघि दुमदुमली पंढरी ||
होतो नामाचा गजर | दिंड्या पताकांचे भार ||
निवृत्ती ज्ञानदेव सोपान | अपार वैष्णव ते जाण ||
हरिकीर्तनाची दाटी | तेथे चोखा घाली मिठी ||

टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा ||
पंढरीची हाट कैवल्याची पेठ | मिळाले संतुष्ठ वारकरी ||
पताकांचे भार मिळाले अपार | गर्जे भीमातीर जयजयकारे ||
खटनट यावे शुद्ध होऊनि जावे | दवंडी पिटी भावे चोखामेळा ||