श्री संत भानुदास महाराज

वेदशास्त्रांचे सार | तो हा विठ्ठल विटेवरी ||
पुढे शोभे चंद्रभागा | स्नाने उद्धार या जा ||
पद्मतळे गोपाळपूर | भक्त आणि हरिहर ||
भानुदास जोडोनि हात | उभा सामोरा तिष्ठत ||

धन्य धन्य हे नगर | भुवैकुंठ पंढरपूर ||
धन्य धन्य चंद्रभागा | मध्ये पुंडलिक उभा ||
धन्य धन्य वेणुनाद | क्रिंडा करितो गोविंद ||
धन्य पद्माळयाची पाळी | गाई चारी वनमाळी ||
धन्य पंढरीचा वास | देवा गाये भानुदास ||

जपता नाम विठ्ठलाचे | भय नाही हो काळाचे ||
नाममंत्र त्रिअक्षर | करी सदा तो उच्चार ||
विठ्ठलनामे सुख आनंद | भानुदासा परमानंद ||