संत बहिणाबाई
संत कृपा झाली | इमारत फळा आली ||
ज्ञानदेवे रचिला पाया | उभारिले देवालया ||
नामा तयाचा किंकर | तेणे केला विस्तार ||
जनार्दन एकनाथ | खांब दिला भागवत ||
तुका झालासे कळस | भजन करा सावकाश ||
बहेणि फडकती ध्वजा | निरूपण केले वोजा ||
प्रपंची असोनि प्रपंचा अतीत | करतिल संत सर्व कर्मी ||
यालागी सेवावे संताचे चरण | मोक्षाचे कारण हेचि येक ||
तक्रातिल लोणी न मिळेची पुन्हा | वेगळ्याची गुणाआत आले ||
पद्मिनीचे पत्र मिळे उदकांत | असताहि तेथ जन्मवरी ||
बहेणि म्हणे तैसे प्रपंची असोन | न बाधी खुण साधूपाशी ||
चालता पाऊल पंढरीच्या वाटे | ब्रम्हसुख भेटे रोकडेचि ||
पहाता ऐसे सुख नाही त्रिभुवनी | ते पहावे नयनी पंढरीसी ||
गाता हरिनाम वाजविता टाळी | प्रेमाचे कल्लोळी सुखवाटे ||
दिंडीचा गजर होतो जयजयकार | मृदं सुस्वर वाजताती ||
हमामा टिपरी घालिती हुंबडी | होवोनिया उघडी विष्णुदास ||
बहेणि म्हणे ऐसा आनंद वाटेचा | कोण तो दैवाचा देखे डोळा ||
|