श्री संत ज्ञानदेव महाराज
रूप पाहता लोचनी | सुख जाले वो साजणी ||1||
तो हा विठ्ठल बरवा | तो हा माधव बरवा ||2||
बहुता सुकृताची जोडी | म्हणुनी विठ्ठली आवडी ||3||
सर्व सुखाचे आगरू | बाप रखुमादेविवरू ||4||
सकल मंगल निधी | श्रीविठ्ठलाचे नाम आधी ||1||
म्हण कारे जना | श्रीविठ्ठलाचे नाम वाचे ||2||
पतीत पावन साचे | श्री विठ्ठलाचे नाम वाचे ||3||
बापरखुमादेविवरू साचे | श्री विठ्ठलाचे नाम साचे ||4||
अवघाचि संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ||1||
जाईन गे माय तया पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया ||2||
सर्व सुकृ ताचे फळ मी लाहीन | क्षेम मी देईन पांडुरंगी ||3||
बापरखुमादेविवरू विठ्ठलेशी भेटी | आपले संवसाटी करूनि ठेवा ||4||
माझे जिवाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||1||
पांडुरंगी मन रंगले | गोविंदाचे गुणी वेधले ||2||
जागृति स्वप्न सुषुप्ति नाठवे | पाहता रूप आनंदी आनंद सांठवे ||3||
बापरखुमादेविवरू सगुण निर्गुण | रूप विटेवरी दाविली खूण ||4||
|